शनीची कडी २३ मार्चला होणार गायब
खगोलीय घटनेवर खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमी यांचे लक्ष
.
वॉशिंग्टन
ग्रहाभोवती असणाऱ्या कड्यांमुळे शनी हा सौरमालेतला सगळ्यात वेगळा ग्रह ठरतो.पण शनीची ही कडी म्हणजे 23 मार्च 2025 ला गायब होतील.
एरव्ही प्रखरपणे चमकणारी ही कडी ज्यावेळी थोड्या काळासाठी दिसेनाशी होतात, तेव्हा शास्त्रज्ञांना शनीबद्दलचे इतर नवीन शोध लावण्याची संधी असते. म्हणजे 1965 ते 1980 या काळामध्ये जितका वेळ शनीची कडी अशी गायब झाली, त्या काळात शास्त्रज्ञांना शनीच्या 13 चंद्रांचा शोध लागला.
मार्च 2025 मध्ये गायब झालेली ही शनीची कडी नोव्हेंबर महिन्यापासून हळुहळू पुन्हा दिसायला लागतील.यानंतर पुन्हा 2038 मध्ये पुढचं ring plane crossing होईल आणि शनीची काडी पुन्हा गायब होतील. तर शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार सुमारे 30 कोटी वर्षांनी शनीची ही कडी कायमचीच गायब होतील
शनी हा आपल्या सूर्यमालेतला इतरांपेक्षा अगदी वेगळा दिसणारा ग्रह आहे. गुरू नंतरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे आणि तो मुख्यतः बनलाय हायड्रोजन आणि हेलियमने. शनी ग्रहाचा व्यास आहे तब्बल 1,16,500 किमी.या ग्रहाचं वेगळेपण म्हणजे त्या भोवती असणारी कडी. 1610 मध्ये खगोलज्ञ गॅलिलिओने पहिल्यांदा आपल्या दुर्बीणीतून ही कडी टिपली.हे एक कडं नसून अनेक आहेत आणि त्यामध्ये अंतर आहे याचा शोध आणखी 20 वर्षांनी लागला. हा शोध ज्यांनी लावला त्या जिओवानी कॅसिनी यांचच नाव या दोन कड्यांमध्ये असणाऱ्या अंतराला देण्यात आलंय. या कॅसिनी यांचंच नाव असलेली एक मोहीम नासाने शनीचा अभ्यास करण्यासाठी पाठवली आहे.आजवर शनीभोवतीच्या 7 कड्यांचा शोध लागला असून त्यांना A, B, C, D, E, F, G अशी नावं देण्यात आली आहेत.
शनीची ही कडी 282,000 किमी अंतरावर पसरलेली आहेत. आणि अगदी एखाद्या धान्याच्या आकाराच्या बर्फकणांपासून ते मोठ्या खडकांसारख्या बर्फापासून ती बनलेली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रिंग्सची जाडी आहे फक्त 1 किमी. ही कडी 40 कोटी वर्षं जुनी असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.नासाच्या संशोधनानुसार काही कोटी वर्षांपूर्वी दोन बर्फाळ चंद्रांची धडक झाली आणि त्यातून निर्माण झालेल्या बर्फकण, दगडांपासून शनीची ही कडी तयार झाली.
गेले काही महिने खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमी शनी ग्रहावर नजर ठेवून आहेत. कारण 23 मार्चला शनीची ही कडी दिसणं बंद होईल.पृथ्वीवरून आपण कोणत्या कोनामध्ये शनीकडे बघतोय यावर ही खगोलीय घटना अवलंबून असते.शनी हा ग्रह आपल्या सौरमालेमध्ये सूर्यापासून 1.43 अब्ज किलोमीटर्स अंतरावर आहे. आपली पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या काळाला आपण 1 वर्ष म्हणतो.त्याच प्रमाणे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या दिवसांनुसार हिशोब केला तर शनीला 29.4 वर्षं लागतात.पृथ्वी आणि शनी हे दोन्ही ग्रह आपापल्या कक्षांमध्ये, आपापल्या वेगानुसार सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरून शनी ग्रह कसा दिसतोय ते दृश्य हळुहळू बदलत असतो.

