विद्यार्थ्यांनीऔद्योगिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे -डॉ. व्ही एन शिंदे
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचा बक्षीस वितरण समारंभ
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा येथे आज वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे हे प्रमुख पाहूणे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन करताना व्यावसायिक पदवीधारक विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी वाचन संस्कृतीचे महत्त्व उदाहरणासह अधोरेखित केले. वाचनामुळे फक्त माहितीच मिळते असं नाही तर मिळालेली माहिती त्याच्यावर विचारमंथन केल्यानंतर व अनुभवाच्या जोरावर त्याचे ज्ञानात रूपांतर होते व हे ज्ञानच भविष्यात तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे. आई-वडील व शिक्षक हेच तुम्हाला आयुष्यासाठी लागणाऱ्या ज्ञानाची महती सांगत असतात त्याचे तुम्ही सदैव आठवण ठेवा व आपल्या कृतीतून यश मिळवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन डॉ. व्ही एन शिंदे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी एस सावंत यांनी आजच्या या सोशल मीडियाच्या व मार्केटिंगच्या युगामध्ये बऱ्याच वेळा असत्य हेच सत्य आहे असा भासवण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्या चौकस बुद्धीतून तुम्ही सत्य पडताळले पाहीजे व सत्याची व न्यायाची पाठराखण केली पाहिजे व आपल्या वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील गरजू घटकांना उपयोगी पडले पाहिजे. तुम्ही रयत शिक्षण संस्थेचे ब्रँड अँबेसिडर आहात कर्मवीरांच्या शिकवणी प्रमाणे मन,मेंदू आणि मनगट बळकट करून आपल्या जीवनामध्ये सुजाण नागरिक व समाजाचा हितचिंतक होण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले.
पाहुण्यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक, क्रिडा, संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळविलेल्या गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा व संशोधन, पुस्तकलेखन व लेख प्रकाशनात दैदिप्यमान यश मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यापीठ व राज्य स्तरावर उल्लेखनीय यश मिळविलेल्या संशोधक विद्यार्थी व शिक्षकांचा रोख बक्षिसासह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ प्रियांका लोखंडे व सौ प्रीती श्री यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक डॉ. एस एस भोला यांनी केली. डॉ एस आर निकम यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी विराज तावस्कर यांनी मानले. शारीरिक शिक्षक संचालक डॉ अक्रम मुजावर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

