स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार
बंद शिवशाही बसमध्ये घृणास्पद कृत्य
पुणे
गजबजलेल्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पुणे हादरलं आहे. भल्या पहाटे हा लाजिरवाणा प्रकार घडला . पीडित तरुणीला अनोळखी आरोपीने एसटी बस अन्यत्र थांबल्याचं खोटं सांगितलं, त्यानंतर तिला बंद बसमध्ये नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप आहे. पहाटे साडेवाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
संबंधित २६ वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. यावेळी एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, मी तिकडे जाणार नाही, असं त्या मुलीने त्या इसमाला सांगितलंही, मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं.
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेली, आणि तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. पण, तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला, अशी माहिती आहे. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय रामदास गाडे असं संशयित आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं.स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

