जरांगेंचे उपोषण स्थगित
सग्यासोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याचा अवधी
जालना
जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भुमरे, राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटी येथे आले होते.त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली असून शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरे मागणीसह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे.यावेळी छत्रपती संभाजी नगरचे नुकतेच विजयी झालेले खासदार संदीपान भुमरे, राणा जगजितसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सरकार सग्यासोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून सरकारचे प्रतिनिधी म्हणून 1 महिन्यात या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित जनसमुदाय समोर दिल्यावर उपस्थितांनी एक मराठा लाख मराठ्यांचा घोष केला.सरकारला यामुळे 13 जुलै पर्यंतचा वेळ मिळाला असून या दरम्यान ते आपला शब्द पुरा करतील अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली.यानंतर खालावलेल्या तब्येतीमुळे जरांगे यांन उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
