प्राथमिक शाळेतच भविष्याचा पाया पक्का होतो:मोनाली काळे – मोरे
१४ वे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन संपन्न
सातारा
प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया पक्का होतो, असे प्रतिपादन माजी विद्यार्थिनी, ड्रीम ब्युटी अँड मेकअप आर्टिस्ट मोनाली काळे – मोरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद पुणे, शाखा सातारा तसेच लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा आयोजित चौदावे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा या ठिकाणी संपन्न झाले त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात संमेलन अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद पुणे, शाखा सातारच्या अध्यक्षा शिल्पा चिटणीस या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, माजी सैनिक रामचंद्र जाधव, संचालक सतीश पवार, मुख्याध्यापक कल्याण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मोनाली काळे – मोरे पुढे म्हणाल्या, प्राथमिक शाळेपासूनच वाचन, लेखन, नृत्य, खेळ यांची आवड जोपासली तर भविष्य उज्वल होऊन स्वावलंबी जगता येते. माझे आई-वडील अशिक्षित असूनही स्वबळावर शिक्षण घेऊन पालकांना आर्थिक मदत केली. शिक्षकांचे मार्गदर्शन आयुष्यभर उपयोगी पडते.
शिल्पा चिटणीस म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुण त्यांची आवड जोपासण्याचे काम साहित्य संमेलन करत असते. विद्यार्थी वेगवेगळ्या स्वरूपाचे ज्ञान आत्मसात करत असतात, हे ज्ञान त्यांना पुस्तकांच्या माध्यमातूनच मिळत असते. विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध करण्याचे काम साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपणाला करायचे आहे.
रामचंद्र जाधव यांनी शिस्तीचे महत्व सांगत मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे विद्यार्थ्यांनी सोने केले पाहिजे, असे सांगितले. विद्यार्थ्यांना सध्या संरक्षण दलात नोकऱ्या उपलब्ध असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
शिरीष चिटणीस म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही गुण असतातच. ते गुण विद्यार्थ्यांनी ओळखून त्या गुणांचा विद्यार्थ्याला विकास करता आला पाहिजे. बालकुमार साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांना कथाकथन, नृत्य, गाणी इत्यादी स्पर्धा मध्ये भाग घेता येतो. या माध्यमातून आपणाला कोण कोणत्या कलांमध्ये निपुण आहे, हे समजून येते.
यावेळी विद्यार्थ्यांनी कविता गायन, गीत गायन, नृत्य गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण भोसले यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सुर्वे यांनी केले. आभार सेग्या गावित यांनी मानले. संमेलनास बाळकृष्ण इंगळे, उज्वला कर्णवर, स्नेहलता अनगळ, नंदा पवार शिक्षक-पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

