१ जूनला इंडिया आघाडीची बैठक
केजरीवाल, स्टॅलिन,तेजस्वी यादव,अखिलेश यादव यांना निमंत्रण
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्याचे मतदान होणार असून, त्यानंतर ०४ जूनला मतमोजणी होणार आहे.भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची एक बैठक १ जून रोजी बोलावण्यात आली आहे.
४ रोजी मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली गेली आहे. विशेष म्हणजे २ जून रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रवानगी पुन्हा एकदा तिहार तुरुंगात होणार आहे. या पूर्वी १ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीच्या कामगिरीचा आढावा आणि पुढील वाटचाल, याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि इतरांसह विरोधी आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुखांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
