जागतिक स्पर्धेत प्रभावी राहण्यासाठी पुस्तके महत्त्वाची


श्रीकांत कात्रे; जनवाचक चळवळीतर्फे बिभवीच्या शाळेला पुस्तके प्रदान

सातारा
जागतिक पातळीवर सर्वच क्षेत्रांत मोठी स्पर्धा असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत टिकून आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी पुस्तकाचे वाचन महत्त्वाचे ठरते, असे मत ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केले.
जावळी तालुक्यातील बिभवी येथील प्राथमिक शाळेत जनवाचक चळवळीतर्फे पुस्तके वाटप कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मेढा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव देशपांडे, जनवाचक चळवळीचे समन्वयक श्रीराम नानल, सहसमन्वयक किरण गाडे, सरपंच संतोष बांदल, शालेय समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक अशोक लकडे, शिक्षक योगेश दिघे, शिक्षिका दीपाली दुंदले व अमिता एरंडे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. श्री. कात्रे म्हणाले, ‘‘चांगली पुस्तके वाचून जीवनाचे नियोजन केले तर आयुष्याला चांगली दिशा मिळते. आजच्या अत्याधुनिक जगात मोबाइल, इंटरनेटसारखी अनेक साधने आली आहेत. त्यामुळे आपण वाचनापासून दूर जात आहोत. अत्याधुनिक साधनांचा उपयोग करताना त्यातील चांगले काय आणि वाईट काय ह समजण्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत.’’
वाचन संस्कृती वाडविण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून जनवाचक चळवळ कार्यरत आहे. समाजातील सुह्रद व्यक्तींकडून मिळणारी पुस्तके ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम ही चळवळ करीत आहे, असे श्री. श्रीराम नानल यांनी यावेळी सांगितले. जावळी तालुक्यात ही चळवळ जोमाने राबविण्यास श्री. विठ्ठलराव देशपांडे यांची बहुमूल्य मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी प्रास्ताविकात शाळेमधील विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी शाळेसाठी दिलेल्या निधीतून शाळेत अत्याधुनिक साधनांची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शाळेमध्ये इंटरॲक्टिव्ह स्क्रीन, संगणक विद्यार्थी सफाईदारपणे वापरतात. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच परिसरातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासकांसाठीही शाळेत सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. आज मिळालेली पुस्तके वाचून विद्यार्थी त्यावर अभिप्राय नोंदवतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सरपंच संतोष बांदल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख वेळोवेळी सहकार्य करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विद्यार्थ्यांना आवडतील अशी चरित्रात्मक, विज्ञानविषयक, सामान्य ज्ञान वाढवणारी पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. अमिता एरंडे यांनी स्वागत केले. दीपाली दुंदले यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

Advertisement

फोटो
बिभवी- जनवाचक चळवळीतर्फे प्राथमिक शाळेत पुस्तके प्रदान करणयात आली. त्यावेळी पुस्तकांसमवेत विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!