तर्कतीर्थ रौप्य महोत्सवी जयंती वर्ष शुभारंभ सोहळा आज पुण्यात


१८ खंडांचे आणि ‘तर्कतीर्थ दिनदर्शिकेचे होणार प्रकाशन

Advertisement

पुणे
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई; महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २७ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकमान्य टिळक मार्ग, पुणे येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा शुभारंभ एका शानदार सोहळयाने संपन्न होणार आहे.
सदर सोहळ्याच्या प्रारंभी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्‌मयाचे संपादक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे भारतभर हा सोहळा कसा संपन्न व्हावा याचे विवेचन करणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे अध्यक्ष, संत साहित्य ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे भूषविणार आहेत.
शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दिग्गजांची वक्तृत्व पर्वणी! डॉ. राजा दीक्षित तर्कतीर्थींच्या मराठी विश्वकोशातील योगदान अधोरेखित करणार आहेत तर प्रा. मिलिंद जोशी त्यांच्या वक्तृत्व व प्रबोधन कार्यावर प्रकाशझोत टाकतील. सतीश देसाई तर्कतीर्थ व यशवंतराव चव्हाण यांचे अनुबंध खुलवणार आहेत. राज्य आयुक्त डॉ. चंद्रकान्त पुलकुंडवार तर्कतीर्थांच्या अज्ञात पैलूंचा उलगडा करणार आहेत.
या प्रसंगी प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या १८ खंडांचे प्रकाशन तसेच तर्कतीर्थ प्रतिष्ठान, वाई मार्फत प्रकाशित ‘तर्कतीर्थ दिनदर्शिका’ प्रकाशित होणार आहे. ‘तर्कतीर्थ दिनदर्शिका’ चे वाटप सर्व उपस्थित श्रोत्यांना मोफत वितरीत केली जाणार आहे.
या हृद्य व संस्मरणीय सोहळ्यास तर्कतीर्थ प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आग्रही अवाहन समारंभ संयोजक शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, सुनीतीराजे पवार प्रभृतींनी संयुक्तरित्या केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!