जिल्हा दूध संघाला सर्वतोपरी सहकार्य करू:खा.नितीन पाटील
सातारा जिल्हा दूध संघातर्फे सत्कार
सातारा
सद्यस्थितीत अडचणीत असलेल्या सातारा जिल्हा दूध संघाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही खासदार नितीन पाटील यांनी दिली.
राज्यसभेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री पाटील यांचा जिल्हा दूध संघातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब कदम होते.
अध्यक्ष कदम यांच्या हस्ते पाटील यांचा शाल – पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना खासदार पाटील म्हणाले ,व्यक्तीबरोबर संस्थेच्या जीवनातही अनेकदा चढउतार येतात. सातारा जिल्हा दूध संघ हा सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून जिल्ह्यात यशस्वीपणे कार्यरत होता ;परंतु अनेक नैसर्गिक तांत्रिक कारणांमुळे ही संस्था अडचणीत आली. या संस्थेशी माझे वडील लक्ष्मणराव पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे अनेक सहकारी हे दूध संघाचे पदाधिकारी राहिले आहेत .त्यामुळे या संघा विषयी माझ्या मनात विशेष आस्था आहे. संघाशी असणारे ऋणानुबंध जपत ही संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करेन.
या प्रसंगी संचालक रघुनाथराव साळुंखे, राजूभाई मुलांनी यांनी संघापुढील अडचणी विशद करीत संघाशी पाटील कुटुंबाच्या असणाऱ्या स्नेहसंबंधाचा मागोवा घेत खासदार पाटील यांच्या राज्यसभेवरील निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.
बाबासाहेब कदम यांनी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील या बंधूंना समाजाविषयी आणि सहकारी संस्थांच्या कामाविषयी विशेष तळमळ असल्याचे सांगून जिल्ह्याच्या विकासात दोघांचा आता हातभार लागेल ,अशी आशा व्यक्त केली. संचालक शाहूराज फाळके यांनी स्वागत – प्रास्ताविक केले. युवराज कदम यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन केले .
सत्कार प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते ,दत्तानाना ढमाळ ,राजेश वाठारकर ,दूध संघाचे संचालक सचिन जाधव, साहेबराव जाधव ,श्रीमती शशिकला जाधव, रत्नमाला निकम, दादासाहेब बडदरे नानासाहेब शिंदे, गणेश चव्हाण, शंकरराव काळे, जयवंत बनसोडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा दूध संघातर्फे खासदार नितीन पाटील यांचा सत्कार करताना अध्यक्ष बाबासाहेब कदम. शेजारी (डावीकडून) संचालिका शशिकला कदम ,शशिकला देशमुख, नानासाहेब शिंदे, युवराज कदम राजेश पाटील -वाठारकर आदी