तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी
६ जणांचा मृत्यू,अनेकजण गंभीर जखमी
अमरावती
आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ६ भाविकांचा मृत्यू झाला . तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काऊंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान येथील भाविकांना दहा दिवसांसाठी वैकुंठ द्वार दर्शन देणार आहे. १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. ९ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून या गेटवरून दर्शन टोकन दिले जाणार आहे. हे टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. तिरुपती आणि तिरुमला येथे टोकन वितरित करण्यासाठी काउंटर उभारले आहेत. दरम्यान, ९ जानेवारीला सकाळी ५ वाजता या केंद्रांवर १०, ११ आणि १२ तारखेसाठी १ लाख २० हजार टोकन वितरित केले जाणार आहेत. पण त्याआधीच भक्तांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे ही घटना घडली
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाविकांचा मृत्यू झाल्याने तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर त्यांनी घटनेतील जखमींना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा देखील केली आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी या घटनेप्रकरणी उच्चस्तरिय बैठक बोलावून आढावा घेतला आहे.मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा मृत्यू हे अतिशय दु:खद आहे.
भाविक मोठ्या संख्येने येणार हे माहित असताना त्यानुसार व्यवस्था का करता आली नाही, असा सवाल मुख्यमंत्री नायडू यांनी केला. मृतांची संख्या वाढू नये, यासाठी सीएम नायडू यांनी जखमींना चांगले उपचार मिळवून देण्यासाठी आणि मृतांचा आकडा वाढू नये यासाठी दक्ष राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

