नगर वाचनालयातील उपक्रम वाचन संस्कृतीला बळ देणारे
ग्रंथ प्रदर्शन उदघाटन प्रसंगी श्रीनिवास मंगलपल्ली यांचे उद्गार
सातारा
‘शासनाचे वाचनविषयक सर्व उपक्रम वाचन संस्कृतीला बळ देणारे आहेत .वेगवेगळ्या वाचनालयात त्यांचे नियोजन केले जाते . नगर वाचनालय जाणीवपूर्वक वाचन संस्कृतीला बळ देण्याचे उपक्रम करत असल्यामुळे त्याचा फायदा वाचक वर्गाला होईल .हे प्राचीन ग्रंथालय असल्यामुळे येथे दुर्मिळ ग्रंथ वाचकांना उपलब्ध होणारे आहेत .त्याचा लाभ वाचकांनी घ्यायला पाहिजे,असे आवाहन शासकीय ग्रंथालयाचे अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली श्रीनिवास मंगलपल्ली यांनी केले
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालय मार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या वाचनविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .नगर वाचनालयामध्ये सामाजिक शास्त्र विषयक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला .या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शासकीय ग्रंथालयाचे अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांचे शुभहस्ते झाले .त्यावेळी पत्रकार अनिल वीर ,श्रीतेज जांभळे ,साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने ,वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर ,कार्यवाह वैदेही कुलकर्णी ,संचालक डॉ शाम बडवे ग्रंथपाल रूपाली मुळे वाचनालयाचे कर्मचारी व वाचक वर्ग उपस्थित होता .
अनिल वीर यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज सगळ्या स्त्रियांना शिक्षण सहज उपलब्ध झाले आहे असे सांगून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना शासनाने भारतरत्न द्यायला हवा असे मत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे आभार मानताना डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले ‘ ग्रंथ हे माणसावर संस्कार करतात . वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ग्रंथ माणसांची सोबत करतात आणि प्रबोधन करतात .सावित्रीबाईंच्या मुळे स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला . वेगवेगळ्या पदावर आज स्त्रिया काम करतात त्या पाठीमागे सावित्रीबाईंचे मोठे योगदान आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे . ‘
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले व वाचनालयांच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला .
या पंधरा दिवसात अजूनही वेगवेगळे साहित्य विषयक वाचन उपक्रम नगर वाचनालयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले आहेत हे सांगितले .
या कार्यक्रमास उल्का शिंदे अन्वेषा कलेढोणकर ,श्री कार्वे , विष्णू धावडे विजय दळवी व मान्यवर नागरिक उपस्थित होते .

