गुरू करून चित्रकला शिकता येत नाही


पुणे बुक फेअरमध्ये रविमुकुल यांचे प्रतिपादन

Advertisement

पुणे
चित्रकला ही शाळा महाविद्यालयात शिकण्याची गोष्ट नाही, गुरू करून चित्रकला शिकता येत नाही, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रकार रविमुकुल यांनी आज येथे केले. पुणे बुक फेअर मध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच स्वप्निल पोरे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस, पुणे बुक फेअरचे संयोजक पी एन आर राजन, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी यावेळी उपस्थित होते.
कलेबाबत समाजात संवेदनशीलतेचा अभाव आहे, अशी खंत रविमुकुल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वास्तविक आपल्या सर्वांना शब्दांची ओळख होते ती चित्रांच्या माध्यमातून. मात्र पुढे हे साहचर्य संपते आणि शब्दांच्या माध्यमातून चित्र समजून घेण्याची वेळ येते. तो कलेचा पराभव आहे. चित्रकलेबद्दल आपल्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, याचे ते प्रतीक होय.
चित्रकलेत घराणी आहेत, पण त्या चौकटी चित्रकार म्हणून विकास घडविण्यात अडथळा बनल्या आहेत, असे मत नोंदवून रविमुकुल यांनी सांगितले की, एखाद्या थोर चित्रकाराने ज्या ठिकाणी चित्रे काढली, तेथेच आणि त्यांनी चित्रासाठी जे घटक वापरले तेच वापरून धन्यता मानली जाते. यातून चित्रकलेची प्रगती होत नसते.
चित्र साक्षरतेचा लेखकांमध्ये अभाव आहे, मुखपृष्ठाच्या महत्वाचे अनेकांना भान नसते. व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे करताना सर्वाधिक समाधान वाटले, अशी भावना व्यक्त करून रविमुकुल म्हणाले, लेखकाने जे लिहिले आहे ते पूर्ण वाचायचे, हा माझा परिपाठ राहिला. काही वेळा पुस्तकाच्या शिर्षकातून देखील मुखपृष्ठाची नेमकी कल्पना आकारास येते.
रविमुकुल यांनी प्रयोगशीलता जपली, असे सूनीताराजे पवार यांनी नमूद केले. शिरीष चिटणीस यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!