त्या मूर्ती 500 वर्षांपूर्वीच्या?
पंढरपूर विठ्ठल मंदिरात सापडलेल्या मुर्तींची चर्चा
पंढरपूर
विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना एका लहानशा तळघरात काही मूर्ती आणि नाणी आढळून आल्या आहेत.याठिकाणी सापडलेल्या ऐतिहासिक साठ्यामध्ये पाच मूर्ती, पादुका आणि काही नाण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर याठिकाणी काही बांगड्याही सापडल्या आहेत.प्राथमिक अंदाजावरून त्या 15 व्या किंवा 16 व्या शतकातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या या मूर्ती मंदिर समितीच्याच ताब्यात आहेत. त्या मंदिर समितीकडेच ठेवणार की पुरातत्व विभागाकडे दिल्या जाणार, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून जतन आणि संवर्धनाच्या संदर्भातील काम सुरू आहे. यामध्ये शुक्रवारी (31 मार्च) मंदिराच्या गाभाऱ्यात चौखांबी आणि सोळखांबीला असलेला चांदीचा मुलामा आणि इतर भिंतींच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं.
विठ्ठल मंदिरातून बाहेर पडण्यासाठी ह्या ठिकाणी हनुमान दरवाजा आहे. या दरवाजाच्या दगडी फरशीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी दगडांच्या भेगा भरण्यसााठी त्यात केमिकल टाकलं जात होतं.पण या दरवाजाच्या फरशीच्या ठिकाणी कितीही केमिकल टाकलं तर ते खालीच जात होतं. त्यामुळे या ठिकाणी पोकळ भाग असावा हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी फरशीचा आणि त्याशेजारचा दगड बाजूला केला. त्यावेळी खाली हे लहानसं तळघर असल्याचं लक्षात आलं.सहा फूट खोल असलेलं हे तळघर अंदाजे पाच बाय तीन फूट अशा आकाराचं असल्याचं सांगितलं जात आहे.मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यानं त्याच्या आत जाऊन पाहिल्यानंतर त्यात या मूर्ती असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्या बाहेर काढण्यात आल्या.
विठ्ठल मंदिरातील या तळघरामध्ये प्रामुख्यानं पाच मूर्ती, पादुका आणि काही नाणी, तसंच बांगड्यांचे तुकडे सापडल्याचं समोर आलं आहे.मूर्तींमध्ये दोन विष्णूच्या मूर्ती आहेत, तर एक महिशासूर मर्दिनीची मूर्ती सापडल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.त्याचबरोबर इतर दोन मूर्तींसह पादुकाही सापडल्या आहेत. यासोबत काही नाणी आणि बांगड्या असल्याचंही आढळून आलं आहे.पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, या मूर्तींमध्ये एक व्यंकटेशाची मूर्ती आहे. विठ्ठल मंदिर परिसरात एक व्यकटेशाचं मंदिर आहे. त्याठिकाणी असलेली मूर्ती आणि सापडलेली मूर्ती यात बरंच साम्य आहे. त्यामुळे नवी मूर्ती बसवली तेव्हा जुन्या मूर्तीसह इतर मूर्ती याठिकाणी ठेवल्या असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पुरातत्व खात्याच्या पुणे विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी बीबीसी बरोबर बोलताना या मूर्ती अंदाजे 15 व्या ते 16 व्या शतकाच्या दरम्यानच्या असू शकतात अशी शक्यता वर्तवली.
साधारणपणे 17 व्या किंवा 18 व्या शतकातील मराठा-पेशवे काळातील मूर्तींची घडाई वेगळ्या पद्धतीची असते. तसंच, 15 व्या शतकाच्या आधीच्या यादव काळातील मूर्तींची घडाईदेखील वेगळी असते.तळघरात सापडलेल्या मूर्तींची घडाई या दोन्ही काळातील मूर्तींच्या तुलनेत वेगळी आहे त्यामुळे अंदाजे या मूर्ती 15 व्या ते 16 व्या शतकातील असू शकतात, पण नेमकं काही सांगता येऊ शकत नाही, असं ते म्हणाले.
“या मूर्तींपैकी दोन विष्णूरुपातील मूर्ती अत्यंत सुरेख आहेत. या मूर्ती मंदिर परिसरातीलच असू शकतात. कारण 16 खांबी मंडपावर विष्णूच्या मूर्तीच्या दोन्ही बाजुला आयुधं हाती असलेले वैष्णव द्वारपाल आहे. तशाच स्वरुपाच्या या मूर्ती आहेत,” असं वाहने म्हणाले.मंदिराबाबतचे अनेक शिलालेख उपलब्ध आहेत, ते वाचून त्यातून याबाबतचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
