मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ
मुंबई
महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी ही शपथ घेतली आहे.मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
तसेच देशभरातील बहुतांश भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली.
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला. राज्यपालांनी थांबवल्यानंतर त्यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे.
2019 साली ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.गेली 10 वर्षं देवेंद्र फडणवीस हे नाव निर्विवादपणे भाजपच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ज्या नव्या राजकीय रचना, डावपेच, घडामोडी या दशकभरात महाराष्ट्रात घडल्या, जे दशक राजकीय अनागोंदीसाठीही उल्लेखात राहील, त्या सगळ्यांमध्ये इतर समकालीन नेत्यांसोबत फडणवीसांचाही ठसा आहे.2014 पर्यंत राज्यातल्या इतर नेत्यांपैकी एक असलेले फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची मुख्यमंत्रीपदाची निवड बनले आणि केंद्रस्थानी आले. दिल्लीत वाजपेयी-अडवाणींची भाजप बदलून मोदी-शाहांची नवी भाजप तयार झाला, तसा महाराष्ट्रात मुंडे-गडकरींचा भाजप नव्यानं फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांचा भाजप बनत गेला.

