विजयराव पंडित याना वि. ल. चाफेकर सामाजिक सेवा पुरस्कार
ज्ञानविकास मंडळाचे वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे डिसेंबरअखेरीस वितरण
सातारा
ज्ञानविकास मंडळाचे वतीने यावर्षी पासून ज्ञानविकास मंडळाचे संस्थापक कै. वि. ल. चाफेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त, वि. ल. चाफेकर यांच्या नावाने ” राज्यस्तरीय वि. ल. चाफेकर सामाजिक सेवा पुरस्कार ” दिला जाणार आहे. पहिला पुरस्कार साताऱ्यातील समाजसेवक विजयराव पंडित याना जाहीर झाला आहे रुपये ११,००० रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे..!
ज्या असाधारण अशा व्यक्तीने कोणत्याही एखाद्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक अथवा कला क्षेत्रात अनेक वर्ष एकनिष्ठेने, सातत्याने भरीव कामगिरी करून त्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे,अशा कार्यकर्त्याला हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. या निमित्ताने ज्ञानविकास मंडळाचे वतीने चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल साताराचे माजी शिक्षक गोविंद बेडकीहाळ, नगर वाचनालयाच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार संजय कोल्हटकर आणि जेष्ठ कवयित्री सौ. प्रमिला कुलकर्णी यांचा समावेश आहे. यावर्षी या निवड समितीने साताऱ्यातील थोर समाजसेवक विजयराव पंडित यांची एकमताने निवड केली आहे. श
विजयराव पंडित यांनी स्व-रूपवर्धिनी पुणे या संस्थेशी संलग्न असलेल्या श्री लक्ष्मी केशव प्रतिष्ठान या संस्थेची २००९ साली स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या वंचित, उपेक्षित आणि अविकसित घटकांच्या सर्वागीण विकासाचे काम ते करीत आहेत. अभ्यासिका, फिरती विज्ञान प्रयोगशाळा, फिरती संगणक प्रयोगशाळा, महिला बचत गट, आरोग्य शिबिरे या कार्यातून ते समाजातील गोरगरीब आणि उपेक्षित वर्गापर्यंत पोचले आहेत.
हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी होणार आहे.