अमेरिकेच्या संघातील मुंबईकर
सौरभ नेत्रावळकरच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष
मुंबई
मूळचा मुंबईचा असलेला सौरभ नेत्रावळकर आता अमेरिकेच्या संघाकडून क्रिकेट खेळतोय.“क्रिकेट पुन्हा कधी खेळायला मिळेल अशी आशा-अपेक्षाही नव्हती. पण खेळायला मिळतंय, यासाठी मी कृतज्ञ आहे.”असे तो म्हणतो
एकेकाळी भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळलेला सौरभ शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, तेव्हा आता आपल्याला क्रिकेटमध्ये संधी नाही, हे त्यानं गृहीतच धरल्यासारखं होतं.पण कुणी म्हणतं ना, तसं सच्चा मुंबईकर मुंबईबाहेर गेला तरी त्याच्यातलं क्रिकेटप्रेम संपत नाही. सौरभचं तसंच झालं.अमेरिकेत शिकतानाही तो मिळेल तेव्हा मिळेल तसं क्रिकेट खेळत राहिला आणि आता थेट आयसीसी ट्वेन्टी20 विश्वचषकाचं दार त्याच्यासाठी उघडलं आहे.
सौरभ नेत्रावळकरचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. तो मुंबईच्या मालाड उपनगरात लहानाचा मोठा झाला आणि दहाव्या वर्षापासून क्रिकेट प्रशिक्षण घेऊ लागला.मुंबईच्या मैदानांवर सराव करत, शालेय क्रिकेटमध्ये धडे गिरवत सौरभची वाटचाल सुरू होती.पण त्याचं नाव खऱ्या अर्थानं पहिल्यांदा समोर आलं, ते 2008-09 च्या मोसमात. त्या वर्षी बीसीसीआयच्या कूचबिहार ट्रॉफी या अंडर-19 क्रिकेट स्पर्धेत सौरभनं सहा सामन्यांत 30 विकेट्स अशी चमकदार कामगिरी केली होती.एरवी मुंबई फलंदाजांची खाण म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथल्या एखाद्या युवा गोलंदाजानं, विशेषतः वेगवान गोलंदाजांची उत्तम कामगिरी लगेच लक्ष वेधून घेते.साहजिकच उंचापुरा, शिडशिडीत बांध्याचा डावखुरी जलदगती गोलंदाजी करणारा सौरभ चर्चेत आला.2010 साली दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिकेत सौरभनं आठ विकेट्स काढल्या आणि पाठोपाठ न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकातही त्यानं नऊ विकेट्स काढल्या.त्यावेळी केएल राहुल, मयांक अगरवाल, जयदेव उनाडकट हे सौरभसोबत अंडर-19 संघात होते. पण त्यांना भारतीय संघापर्यंत पोहोचता आलं, तसं सौरभचं झालं नाही.
क्रिकेटबरोबरच सौरभला अभ्यासाचीही आवड होती. एकीकडे त्यानं 2009-13 या काळात मुंबईच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं.
तो सांगतो, “2013 साली इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली होती पुण्यात. तेव्हा मी ठरवलं होतं की दोन वर्ष तरी नोकरी करायची नाही, आणि क्रिकेटलाच वेळ द्यायचा. मला मुंबई टीमसाठी प्रयत्न करायचा होता. त्या वर्षीच माझं मुंबई रणजी संघात पदार्पण झालं.”दोन वर्ष सौरभनं प्रयत्न केले, पण संघात स्पर्धा इतकी होती की लगेच त्याला स्थान पक्कं करता आलं नाही आणि आयपीएलमध्येही संधी मिळाली नाही.अवघ्या 23 वर्षांच्या वयात क्रिकेटर्सच्या कारकीर्दीची खरी सुरुवात होते. पण त्या वयात सौरभनं क्रिकेट सोडायचं ठरवलं.मुंबई रणजी संघातलं स्थान निश्चित होत नव्हतं आणि पुढे भारतासाठी खेळायला मिळेल असा मार्ग तेव्हा दिसत नव्हता. त्यामुळे शिक्षणाकडे वळायचं, अभ्यासावर लक्ष द्यायचं सौरभनं ठरवलं ठरवलं.
“2015 साली बॅकअप ऑप्शन म्हणून मी अमेरिकेत मास्टर्ससाठी प्रवेश परिक्षा दिली होती. माझ्या सोबत इंजिनियरींग करणारे अनेकजण अमेरिकेत शिकत होते, त्यांचे अनुभव मला माहिती झाले होते.“मास्टर्ससाठी न्यूयॉर्कच्या कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश मिळाला, जे कॉम्प्युटर सायन्ससाठी जगातल्या आघाडीच्या विद्यापिठांपैकी एक मानलं जातं.”2015 साली पुढच्या शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेला निघून गेला. पुढे वर्षभरात त्याला ओरॅकल या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही मिळाली.सौरभनं या काळात क्रिकेटविषयीचं एक अॅपही तयार केलं होतं. अलीकडच्या काळात इन्स्टाग्रामवर त्याच्या योगा आणि गाण्याच्या व्हिडियोंचीही चर्चा झाली.
