मतदानासाठी यंत्रणा सज्ज
9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्र
मुंबई
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे.निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही सरमिसळीकरण देखील झाले आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे.संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी 86,462 अर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक 16.11.2024 पर्यंत गृह मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 06.00 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल.
राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer) 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 72 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली आहे. तसेच, 288 मतदार संघांमध्ये 146 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक मतमोजणीसाठी उपस्थित असणार आहेत.

