कोरेगावात भव्य मतदान दौड
हजारो विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
कोरेगाव
लक्षात ठेवा 20 नोव्हेंबर, जागरूक मतदार देशाचा आधार, अशा घोषणा देत कोरेगाव शहरात मतदानाची आठवण करून देण्यासाठी आणि मतदान जागृती करण्यासाठी भव्य दौड काढण्यात आली. यामध्ये सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अमाप उत्साहात ही ही दौड सरस्वती विद्यालय ते हुतात्मा स्मारक पर्यंत काढण्यात आली आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले न्यू सरस्वती इंग्लिश स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, शाळा क्रमांक एक ,शाळा क्रमांक दोन, फिनिक्स शाळा, सुभाष नगर शाळा, लक्ष्मी नगर शाळा अशा सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दौडमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. कोरेगाव मतदार संघाच्या मतदान जागृती पथकाद्वारे मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. व्याख्याने विविध स्पर्धा रॅली दौड इत्यादी उपक्रमातून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी शंभर टक्के मतदान गरजेचे आहे. आपल्या भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे असा संदेश या सर्व उपक्रमातून मतदार संघामध्ये पोहोचवण्यात येत आहे . हुतात्मा स्मारक येथे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि नागरिकांसह मतदान जागृती ची शपथ घेतली.नोडल अधिकारी धनंजय चोपडे यांचे या सर्व उपक्रमाला मार्गदर्शन लाभले

