शुक्रवारी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर
कोल्हापूर,जत,कराड,पुणे येथे जाहीर सभा
कोल्हापूर
20 नोव्हेंबरला होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बड्या नेत्यांची फौज प्रचारात उतरवण्याचे ठरविले आहे. भाजपचे चाणक्य समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जातीने महायुतीच्या विशेषतः भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा पहिल्या टप्प्यातील दौरा 8 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी होत आहे. या दिवशी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. सभेचे ठिकाण अद्याप ठरले नसले तरी शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.
अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत .त्यांचे कोल्हापूरवर विशेष लक्ष राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी सभा घेतली होती. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावाही कोल्हापूरला घेतला होता .पहिल्या टप्प्यात अमित शहा यांच्या 8 नोव्हेंबर रोजी जत (सांगली) कराड दक्षिण( सातारा) व पर्वती (पुणे) येथे सभांचे आयोजन करण्यात येणार आहे

