नरेंद्र मोदींच्या चार दिवसात नऊ सभा
13 नोव्हेंबरला सोलापूर, कोल्हापुरात सभा
कोल्हापूर
महाराष्ट्र विधानसभेच्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्तारूढ महायुतीने प्रचाराचा धडाका लावला आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी कंबर कसली आहे. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पहिल्या टप्प्यातील त्यांच्या दौऱ्यात चार दिवसात नऊ सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
8 नोव्हेंबरला प्रथम नरेंद्र मोदी महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडतील. त्या दिवशी त्यांच्या धुळे व नाशिक येथे सभा होतील. दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या अकोला व चिमूर येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तेरा व 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. 13 नोव्हेंबर रोजी त्यांच्या सोलापूर व कोल्हापूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा ते महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत .या दिवशी त्यांच्या संभाजीनगर ,नवी मुंबई व मुंबई येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा मोठ्या जनसागराच्या उपस्थितीत व्हाव्यात, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.