हिजबुल्ला चीफचा खात्मा?
इस्रायलचा हिजबुल्लाच्या मुख्य कार्यालयावर जोरदार हल्ला
बैरूत :
इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातले हल्ले आता वाढले आहेत. इस्रायलच्या हवाई दलाने शुक्रवारी सायंकाळी लेबनॉनची राजधानी बैरूतवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. इस्रायलच्या लष्कराने सांगितलं की, हिजबुल्लाच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला.हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह टार्गेटवर होता. तो त्यावेळी कमांड सेंटरमध्ये होता. त्याचा खात्मा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता हिजबुल्ला प्रत्युत्तर देत आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, आम्ही असे हल्ले केले आहेत की, त्यातून नसरल्लाह जिवंत वाचण्याची शक्यता कमी आहे. अनेक हिब्रू माध्यमांनी इस्रायलच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं की, नसरल्ला भूमिगत मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात मारला गेला. या हल्ल्याने लेबनॉनच्या राजधानीला हादरवून टाकलं आहे. शहराच्या वर आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून मृतांबाबत मात्र माहिती समोर आलेली नाही.
हिजबुल्लाच्या सूत्रांनी सांगितलं की, इस्रायलच्या हल्ल्यात सहा इमारती उद्ध्वस्त झाल्या. हिजबुल्ला आणि इस्रायलच्या संघर्षात गेल्या वर्षभरातील हा सर्वात मोठा हल्ला होता. इस्रायलच्या टेलिव्हिजन नेटवर्कने सांगितलं की, हल्ल्यात एकूण दहा टन स्फोटकांचा समावेश होता.
हिजबुल्लाच्या मुख्यालयावर एअर स्ट्राइक झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला केला.रॉकेट डागण्यात आले. इस्रायच्या निहारिया परिसरात रॉकेट आणि मिसाइल सायरन वाजायला सुरुवात झाली. हिजबुल्लाने एका मिनिटात ३० तर अर्ध्या तासात ६५ रॉकेट इस्रायलवर डागले.

