साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या
हातावरील सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर आरोप
सातारा
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.” या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.
गुरुवारी रात्री महिला डॉक्टरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे आत्महत्येचे प्रकरण आता गुन्हेगारी चौकशीच्या टप्प्यावर गेले आहे.
याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मला आत्तापर्यंत या घटनेचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांकडून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात खोलवर तपास करू. या प्रकरणातील सर्व पुरावे जमा करू. मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेऊ. या घटनेत जो कोणी दोषी असेल तरी त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जे कोणी हे कृती कृत्य केलेले आहे त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही खरंच अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. एकीकडे लाडक्या बहिणी सारख्या योजना शासन राबवत आहे मात्र त्याच वेळेला बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा वाऱ्यावर सोडला जातो. एका अत्यंत सुशिक्षित डॉक्टरचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत व्हावा, ही इथल्या समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारी बाब आहे.

