पेजरच्या स्फोटांनी हादरलं लेबनॉन
४ हजार पेजरचा स्फोट ,८ जणांचा मृत्यू
जेरुसलेम
लेबनॉनमध्ये मंगळवारी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पेजरच्या स्फोटाने खळबळ उडाली आहे. मोबाईल फोनच्या काळात पेजरचा वापर आणि त्याच्या स्फोटाने लेबॉनन हादरलं आहे. जवळपास ४ हजार पेजरचा स्फोट झाला असून यात ८ जणांचा मृत्यू झाला.
यात खासदाराच्या मुलाचाही समावेश आहे. अद्याप या स्फोटांप्रकरणी कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. पण हिजबुल्लाने यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप केला आहे .
पेजर किंवा बीपर एक लहान पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ज्याचा वापर अल्फान्यूमेरिक किंवा व्हॉइस मेसेजसाठी केला जातो. मोबाईल फोन येण्याआधी १९९० च्या दशकात आणि त्याआधी याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता.पेजरला सामान्यपणे व्हीएचएफ किंवा युएचएफ बँडच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरच रेडिओ सिग्नल मिळतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पेजर वापरणाऱ्याशी संपर्क करायचा असेल तर एक विशिष्ट कोड, मेसेज किंवा वायर मेसेज पाठवतो. याची बॅटरी बराच काळ चालते. याचा वापर त्या क्षेत्रात केला जाऊ शकतो जिथं मोबाईल फोनचं नेटवर्क खूप कमी किंवा आजिबात नसतं.
पेजरला मेसेजेस वेगात पोहोचतात. आपत्कालिन स्थितीत महत्त्वाचा मेसेज पोहोचवण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा आकार लहान आणि वजन कमी असल्यानंच तो पोर्टेबल बनतो. यामुळे तो सहजपणे कुठेही नेता येतो. मोबाईल फोनच्या तुलनेत पेजरची बॅटरी बराच काळ चालते. यात फोन नंबर किंवा सिम कार्ड नसल्यानं पेजरमुळे खासगीपणा आणि विश्वासार्हता राहते.
इतक्या मोठ्या संखेने पेजरच्या स्फोटांमागे गुप्त माहिती आणि तांत्रिक क्षमता दोन्ही महत्त्वाचे ठरले असावेत. गाझामध्ये संघर्ष झाल्यानंतर हिजबुल्लाने त्यांच्या दहशतवाद्यांना इस्रायली गुप्तचरांकडून हॅकिंगचा धोका नको म्हणून मोबाईल फोन न वापरण्याचा सल्ला दिला होता. पेजर्स तयार करणाऱ्या किंवा पुरवठा करणाऱ्या ठिकाणीच त्यात बदल करून हे घडवून आणल्याची शंका आहे.पेजरमध्ये १० ते २० ग्रॅम इतके मिलिट्री ग्रेडची स्फोटकं भरलेले खोटे पार्ट फिट केले गेले असावेत. त्यात अल्फान्यूमेरिक टेक्स्ट मेसेज सिग्नल असावेत. एकदा एक्टिव्ह झाल्यानंतर पेजरचा वापर करणारा व्यक्ती अनावधानानेच यात स्फोटक फुटण्यासाठी ते चालु करेल. आतापर्यंत जितके पेजर फुटले त्यातील एक टक्के पेजर जीवावर बेतणारे ठरले. मात्र हजारो लोक जखमी झाले आहेत.
पेजरमध्ये स्फोटकं नसतील तर हा शरिराला धोका पोहोचवणारा सर्वात भयंकर असा सायबर हल्ला मानला जाऊ शकतो. या पेजरमध्ये व्हायरस हल्ला केला गेला असावा. यात बॅटरीत शॉर्टसर्किट किंवा ओव्हरचार्जिंग आणि थर्मल रनवेमुळे फुटले असावेत. अनेक डिव्हाइसमध्ये बॅटरी फेल होण्यापासून वाचण्यासाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमचं सॉफ्टवेअर असतं. हे सिस्टिमला सांगतं की बॅटरी किंती चार्ज आणि डिस्चार्ज होईल.

