८०० किलो बाजरीपासून पंतप्रधान मोदींचे पेंटिंग
१३ वर्षीय मुलीच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.त्यांनिमित्त एका मुलीने ८०० किलो बाजरीचा वापर करून पंतप्रधान मोदींचे चित्र तयार केले आहे. हे जगातील सर्वात मोठे बाजरीपासून बनवलेले चित्र आहे आणि त्यामुळे याची जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. ही कलाकृती मुलीने १२ तासांत पूर्ण केली. प्रेस्ली शेकिना असे या मुलीचे नाव असून ती चेन्नईतील वेल्लमल शाळेची विद्यार्थिनी आहे. पंतप्रधानांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याची इच्छा व्यक्त करत तिने या प्रकल्पावर काम सुरू केले.
प्रेस्ली शेकिना हिने सकाळी साडे आठ वाजता पेंटीग सुरू करून रात्री साडे आठ वाजता पूर्ण केले. पंतप्रधान मोदींची ही कलाकृती ६०० चौरस फुटांमध्ये पसरलेली असून, आता जगातील सर्वात मोठी बाजरी पेंटिंग म्हणून ओळखली जाणार आहे. प्रेस्ली शेकिनाच्या वडिलांचे नाव प्रताप सेल्वम आणि आईचे नाव संकीर आहे. त्यांच्या मुलीच्या या कामगिरीची युनिको वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली आहे. युनिको वर्ल्ड रेकॉर्डचे संचालक आर. शिवरामन यांच्या हस्ते मुलीला प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कुटुंबियांनी शेकीनाच्या कामाचे खूप कौतुक केले आहे.

