हौथी बंडखोरांनी इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र
हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने केला २००० किलोमीटर प्रवास
जेरुसलेम
येमेनच्या उत्तरेकडील भागावर ताबा मिळवलेल्या इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागले रविवारी प्रथमच इस्रायलच्या मध्यभागी ते पोहोचले. 2 हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापल्यानंतर हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या आत आले आहे.गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, हौथींनी अनेक वेळा इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रथमच त्यांचे क्षेपणास्त्र इस्रायलच्या मध्यभागी पोहोचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, हौथी बंडखोरांना या धाडसाची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
हौथी प्रवक्ता याह्या सारिया यांनी सांगितले की, संघटनेने एक नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार केले आहे ज्याने केवळ 11 मिनिटे 30 सेकंदात 2,040 किलोमीटरचे अंतर कापले आहे. हौथींनी येमेनच्या जमिनीच्या सीमेबाहेरील ठिकाणाहून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले होते.क्षेपणास्त्र इस्रायलच्या आकाशात येताच इस्रायलमध्ये घबराट पसरली आणि अलर्ट सायरन वाजू लागले, लोक धावत आले आणि भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपले. मध्य इस्रायलमधील रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या जागेत क्षेपणास्त्राचे तुकडे सापडले आहेत. या क्षेपणास्त्राचा आकाशात स्फोट झाल्याचा लष्कराचा अंदाज आहे.
इस्त्रायली संरक्षण यंत्रणेच्या क्षेपणास्त्राने ते नष्ट केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्षेपणास्त्राच्या तुकड्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. हौथीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उपप्रमुख नसरेद्दीन आमेर यांनी सांगितले की, इस्रायलने त्यांच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी 20 क्षेपणास्त्रे डागली पण ती अयशस्वी झाली.याआधी हौथींने जुलैमध्ये तेल अवीववर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात एक इस्रायली नागरिक ठार झाला तर चार जण जखमी झाले. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायली लढाऊ विमानांनी येमेनमधील होडेडा बंदराजवळ बॉम्बफेक केली, ज्यामध्ये सहा जण ठार आणि 80 जखमी झाले.
रविवारी लेबनॉनमधून इस्रायलवर 40 रॉकेट आणि क्षेपणास्त्रेही डागण्यात आली मात्र त्यात कोणतेही नुकसान झाले नाही, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

