हे आहेत डॉल्बीच्या दणदणाटाचे परिणाम
बहिरेपण येईल किंवा हृदयविकाराचा धक्का बसेल
सातारा
गेल्या अनेक वर्षांमध्ये सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या विशेष प्रसंगी मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या प्रदूषणाने डोकं वर काढलं आहे.डॉल्बी साऊंड किंवा कोणत्याही वाद्यांच्या अतिरेकी सलग दणदणाटाचा आपल्या आणि प्राण्याच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. हे आवाज अचानक कानावर येणं किंवा सलग काही काळ कानावर आदळणं या दोन्हीचेही विपरित परिणाम होतात.
एकेकाळी ध्वनी प्रदूषण आणि लेसर किरणांच्या प्रदूषणाला दुर्लक्षित प्रदूषण म्हटलं जाई. आता ही परिस्थिती पूर्ण बदललेली आहे.संयुक्त राष्ट्रांनी याबाबत इशारा दिला आहे. शहरातील ध्वनी प्रदूषणामुळं जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्याचा परिणाम झाल्यानं युरोपियन युनियनमध्ये दरवर्षी 12,000 अकाली मृत्यू होत आहेत. ध्वनी प्रदूषणाचा अमेरिकेतील अंदाजे 10 कोटी लोकांवर परिणाम होत आहे.
कान बधीर करुन टाकणारे आवाज सर्व वयोगटातल्या त्रासदायक असतात त्यातही लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींना याचा जास्त त्रास होतो.ज्येष्ठ नागरिकांवरही त्याचा परिणाम होतो. याचं सर्वात आधी दिसणारं लक्षण म्हणजे हृद्यात धडधड वाढणे आणि रक्तदाबावर परिणाम होणे.तज्ज्ञांच्या मते, हृदयावर ताण आल्यामुळे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत हा त्रास जाऊ शकतो किंवा स्ट्रोकचाही त्रास होऊ शकतो.
दणदणाट करणाऱ्या आवाजामुळे आपली झोप विचलित होते. एकदा झोप विस्कळीत झाली की त्याचा आपल्या रोजच्या दिनक्रमावर आणि आरोग्यावर थेट परिणाम दिसून येतो.
ध्वनी प्रदुषण किंवा सणासुदीच्या काळात होणाऱ्या दणदणाटाचा त्रास टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ते प्रदूषण होणंच टाळणं. पण बहुतांशवेळा ते आपल्या हातात नसतं. त्यामुळे काही उपाय करण्याची गरज भासते.
तज्ज्ञ डॉक्टर सांगतात, शक्य असेल तर या दणदणाटापासून दूर गेलं पाहिजे. जर ते शक्य नसेल तर दारं-खिडक्या लावून त्याची तीव्रता कमी केली पाहिजे. हा गोंगाट कमी करणारे इअरफोन्स, इअरप्लग्ज तसेच इअर मफ्स मिळतात. त्याचा वापर करता येईल. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींसाठी हा उपाय केला पाहिजे.
गर्दीच्या ठिकाणी आपण 110 डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता गणेशोत्सव मंडळांच्या व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या लोकांना हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी जास्त आवाज असलेल्या ठिकाणी राहू नये. गर्भवतींनी डीजेच्या आवाजापासून दूर राहावे.”
मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने श्रवणशक्ती कायमची कमी होऊ शकते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतील पेशींचे नुकसान होते. त्याचा परिणाम शरीरावरच नाही तर मनावरही होतो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढून झोपेवरही परिणाम होतो. आवाजामुळे गर्भवती महिलांमध्ये तणाव निर्माण होतो. याचा परिणाम आई आणि तिचे बाळ दोघांवरही होऊ शकतो.

