अष्टविनायक दर्शन:थेऊर


घरबसल्या करा अष्टविनायक यात्रा

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत आहेत.पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे आहेत

Advertisement

थेऊरचा श्री चिंतामणी
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणि महाराज देव यांनी सुमारें ४०,००० रु. खर्चून है गणमतिमंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्रीधरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनीं थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य सभामंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढविला. त्यानंतर हरीपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयांची शोभा व भव्यता वाढविली आहे. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला.[७] माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे.
श्रीचिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुखी आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्यात तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत.श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असणाऱ्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्गल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लम्बोदरांचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजीअप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजां कडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्रीचिंतामणींच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षीनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले. त्या स्थानी कदंब वृक्ष नावाने आजही भव्य वृक्ष पाहायला मिळतो. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.

यात्रा
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!