अष्टविनायक दर्शन:मोरगांव


घरबसल्या करा अष्टविनायक यात्रा

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदिरे आहेत आहेत.पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे आहेत

Advertisement

मोरगांवचा मोरेश्वर
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली होती. त्यामुळे त्याने श्री मोरयाना “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील” असा आशीर्वाद दिला.आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणले जाते. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे.प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हणले जाते. जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे.या ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले आहे.

यात्रा
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!