पुणे बुक फेयरमध्ये कवी संमेलन
पुणे
महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे यांच्या सहकार्याने पुणे बुक फेअर आयोजित २२ व्या ग्रंथ प्रदर्शनात निमंत्रीतांचे कवी संमेलन गणेश क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये पार पडले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना भाऊसाहेब कारेकर म्हणाले,मराठी भाषा विषय आणि साहित्याची गोडी लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या युगामध्ये, वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे,ही दुर्दैवाची बाब आहे.खरं तर, पुस्तकांचे वाचन हा आपल्या ज्ञान,विज्ञान,साहित्य, समाज आणि संस्कृतीचा पाया आहे.तो नव्या पिढीमध्ये भक्कम होण्यासाठी पुणे बुक फेअर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्था निष्ठेने आणि सातत्याने कार्यरत आहेत.मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.त्यामुळे मराठी साहित्य प्रचार-प्रसाराच्या या कार्यासाठी आमच्या शासकीय विभागातर्फे पुणे जिल्ह्यातल्या शाळांमध्ये जे उपक्रम करणे शक्य आहे,ते आपण परस्पर सहकार्याने करू या. त्यासाठी जिल्हा परिषद सर्व प्रकारे सदैव पाठीशी राहील
प्रा. डॉ. संदीप सांगळे म्हणाले,पुणे बुक फेअर सारख्या उपक्रमांमधून निश्चितपणे साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढील काळात महाराष्ट्रातील सर्वच साहित्य संस्था साहित्य रसिक व कवी लेखक मंडळींनी आपापली जबाबदारी ओळखून मराठी भाषेचे वैभव समृद्ध करण्यासाठी आणि मराठीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
भाऊसाहेब कारेकर आणि डॉ संदीप सांगळे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर कवींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कवी संमेलनाचे सुत्रसंचालन कवयित्री चंचल काळे आणि कवयित्री-लेखिका डॉ प्राची गडकरी यांनी केले.मसापचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.पुणे बुक फेअरचे राजन यांनी आभार मानले.
या निमंत्रित कवी संमेलनात अंजली कुलकर्णी, मिलिंद सुधाकर जोशी, रमेश जाधव, बंडा जोशी, सविता कुरुंदवाडे, डॉ. वैशाली मोहिते, मीना शिंदे, ज्योत्स्ना चांदगुडे, ॲड. संध्या गोळे, रुपाली अवचरे, चंचल काळे,स्वाती यादव, राजश्री सोले, अशोक भांबुरे, अनिल दीक्षित, धनंजय तडवळकर, सुजित कदम, क्रांती राणे-पाटील, सुनिता टिल्लू, मीनाश्री नवले, वि.दा. पिंगळे, बाबा (विलास) ठाकूर, डॉ. राजेंद्र फंड, राहुल भोसले, रोहिणी शेवाळे आणि इतरांनी कविता सादर केल्या

