यशोदा शैक्षणिक क्षेत्रात नवी उंची गाठेल: प्रा. डॉ. शिवाजीराव कदम
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
सातारा
यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा १८ वा वर्धापन दिन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे भारती विद्यापीठ, पुणेचे कुलपती मा. प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष मा. प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते, तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष व निमंत्रक डॉ. अजिंक्य सगरे, सचिव सौ. साधना सगरे, विश्वस्त प्रा. सौ. नम्रता सगरे, विश्वस्त आर्किटेक्ट डॉ. स्वराली सगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, विजयादशमीच्या शुभदिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दशरथ सगरे यांचा वाढदिवसही असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. वर्धापन दिन आणि संस्थापक अध्यक्षांचा वाढदिवस अशा दुहेरी आनंदाच्या वातावरणात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणाऱ्या ‘पानगाव ते सातारा: प्रेरणादायी प्रवास’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखन प्राचार्य अनिल बोधे यांनी केले असून, प्रा. संतोष फाजगे, श्री खुडे सर यांनी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. प्रा. डॉ. दशरथ सगरे यांचा संघर्षमय जीवनप्रवास, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्याची प्रेरणादायी गाथा या ग्रंथातून वाचकांसमोर उलगडली आहे. जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हा प्रेरणादायी संदेश या पुस्तकातून मिळतो.
प्रा. डॉ. शिवाजीराव कदम (समारंभाध्यक्ष) यांनी संस्थेची वाटचाल, व्याप्ती आणि भविष्यातील संकल्पांचा विचार करता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशोदा संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. देशाच्या जीडीपीमध्ये शिक्षणासाठी अधिक तरतूद करण्याची आणि संशोधनावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, उच्च शिक्षणातील सकल नोंदणी गुणोत्तर ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. यशोदा संस्था लवकरच विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात नवी उंची गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, कल्पकता आणि करिअरच्या विविध संधींची जाणीव निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. अभावातून प्रभाव कसा निर्माण करायचा आणि प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूलता कशी साधायची, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे प्रा. डॉ. दशरथ सगरे यांचा जीवनप्रवास होय, असे त्यांनी नमूद केले. सगरे सरांचे गोत्र आणि वैचारिक वारसा जाणून घ्यायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा लागेल. या महापुरुषांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रत्यय सगरे सरांच्या जीवनप्रवासातून येतो, असे गौरवोद्गार प्रा. जोशी यांनी काढले.
डॉ. दशरथ सगरे सरांच्या आईचे दुर्मिळ चित्र प्रा. डॉ.स्वराली सगरे यांनी निर्माण केले व त्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला सहसंचालक डॉ. रणधीरसिंह मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
.
प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, भारती विद्यापीठाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून यशोदा संस्थेने यशस्वी वाटचाल केली आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर व व्यावसायिक शिक्षणापर्यंत संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. संस्थेच्या ३२ शाखांमध्ये १५,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, ५०० हून अधिक शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ७५ हून अधिक शिक्षक पीएच.डी. पदवीधारक आहेत. गुणवत्ता, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देत संस्थेने स्मार्ट क्लासरूम्स, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी केली आहे. संस्थेला आतापर्यंत १९ पेटंट्स प्राप्त झाली आहेत. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच, ९२१ गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करत संस्थेने आपले सामाजिक दायित्वही जपले आहे.
वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमासाठी दीपक पवार, संजय मोरे, अतुल माळी, संजय कदम, महेश शिर्के, संजय शेलार, राजेंद्र साळुंखे, रणजीत घाडगे, राजेश कासार, कनुभाई भुपतानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, सहसंचालक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया मंद्रुपकर, प्रा. प्रिया इंगवले, आणि डॉ. अमृता मोहिते, यांनी केले.
फोटो:
प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी, निमंत्रक डॉ. अजिंक्य सगरे, लेखक आणि मान्यवर

