समाजातील लहान लहान घटकांमागे माध्यमांनी उभे राहावे
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचे प्रतिपादन,श्रीकांत कात्रे यांच्या ‘प्रकाशरेषा’ पुस्तकाचे प्रकाशन
सातारा
समाजात सकारात्मतेने पाहिल्यास पत्रकारिता सकारात्मक होते. समाजातील लहान लहान घटकांमागे माध्यमांनी उभे राहणे आवश्यक आहे. ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. आपल्यापर्यत न येणार्या लोकांकडे माध्यमांनी जाणे गरजेचे आहे. प्रत्येकाने विधायकता जपून काम करणे आवश्यक आहे. सामान्य माणसातील विधायकता प्रचंड मोठी आहे. त्याला माध्यमांनी महत्व दिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले
दै. प्रभातच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांच्या ’प्रकाशरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ,एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, सौ. श्रध्दा कात्रे, तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, श्रीकांत शेटे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, बाबूराव शिंदे, नरेंद्र जाधव, उल्हास भिडे, संयोगिता माजगावकर, प्रशांत तरडे, प्रा. संध्या चौगुले हे एकसष्टीपूर्ती गौरव समितीमधील सदस्य उपस्थित होते.
विजय कुवळेकर म्हणाले,समाजातील चांगुलपणाला प्रत्येकाने बळ दिले पाहिजे. श्रीकांत कात्रे यांसारख्या माणसाचा सत्कार म्हणजे चांगुलपणाला दाद देणे असते.कात्रे यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे कायमस्वरूपी मार्गदर्शक म्हणून काम करतील
सातारा जिल्ह्यामध्ये अंधारावर मात करणारी माणसे आहेत आणि होऊन गेली. चांगुलपणावर विश्वास वाढेल अशा पद्धतीचे कार्य करुन या माणसांनी इतरांना प्रेरणा दिली. समाजातील चांगल्या माणसांपर्यंत माध्यमांनी पोहचले पाहिजे. श्रीकांत कात्रे यांनी असे काम केले. त्यातून निर्माण झालेल्या प्रकाशरेषा पुस्तकातील व्यक्ती सातारकरांची मान उंचावणार्या आहेत, असे मत माजी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी व्यक्त केले.
राजीव खांडेकर म्हणाले,‘मी व श्रीकांत कात्रे एकाच वेळी बरोबर 35 वर्षांपूर्वी पत्रकारितेत आलो. कात्रे यांचे सुंदर अक्षर व एकटाकी लेखन सर्वानाच भावणारे आहे. मुंबई, पुण्यात बसून पत्रकारिता करणे सोपे आहे. मात्र, जिल्ह्यात काम करणे खूप आव्हानात्मक आहे. कात्रे यांनी ते लीलया पेलले. समाजात चांगले काम करणार्या लोकांनाही माध्यमाने पुढे आणणे आवश्यक आहे. यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळेल. विविध क्षेत्रातील लोकांच्या कार्याबद्दलचे प्रकाशरेषा पुस्तक समाजासाठी मोलाचे आहे.
श्रीकांत कात्रे यांनी आयुष्यभर सकारात्मक पत्रकारिता केली. त्यांचे लेखन कायमच प्रेरणादायी होते. त्याच्या धावपळीच्या वाटचालीत कुटुंबीयांनी त्यांना उत्तम साथ दिली, असे डॉ. अच्युत गोडबोले यांनी सांगितले.
श्रीकांत कात्रे म्हणाले, 24 वर्षांपूर्वी लिहिलेले लेख प्रकाशरेषा या पुस्तकात आहेत. साधी माणसे मात्र समाजात वेगळा ठसा उमटविनारे 55 लेख आहेत. सकाळने खूप साथ दिली. समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांनी मला आयुष्यात सहकार्य केले.
प्रकाश गवळी यांनी प्रास्ताविकात श्री. कात्रे यांनी शहरातील तसेच जिल्ह्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली. सौ. श्रध्दा कात्रे, श्री. अनिलकुमार सिंह, श्री. अभिषेक दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. विजय मांडके यांनी आभार मानले.

