अशोक खरातनंतर आता आदर्श म्हात्रेचं भयानक कांड
उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण
मुंबई
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सर्वत्र चर्चा असतानाच आता स्वतःला ‘इस्त्रो’चा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून डझनभर महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे
केवळ दहावी पास असलेल्या या 21 वर्षीय तरुणाची काम करण्याची पद्धत थक्क करणारी आहे. आदर्श म्हात्रे याने मॅट्रिमोनी साईट्सवर 12 वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाईल्स तयार केले होते. ज्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि गलेलठ्ठ पगार घेतात, अशा महिलांना तो आपले लक्ष्य करायचा.
तो कधी शास्त्रज्ञ, कधी डॉक्टर, तर कधी बँक अधिकारी असल्याचे सांगायचा. महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो खोट्या ओळखीची कागदपत्रेही वापरत असे. स्वतःचे राहणीमान उच्च ठेवून आणि लग्नाचे आमिष दाखवून तो महिलांशी जवळीक साधायचा. एकदा विश्वास निर्माण झाला की, तो त्यांच्याशी शारीरिक लगट करून लैंगिक शोषण करत असे. केवळ लैंगिक शोषणच नाही, तर अनेक महिलांकडून त्याने लग्नाचे कारण सांगून किंवा वैयक्तिक अडचणींचे कारण देऊन मोठी रक्कम उकळल्याचेही तपासात समोर आले आहे.
आदर्श म्हात्रेचे कारनामे केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नाहीत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्याच्याविरोधात नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींनुसार, हा तरुण अत्यंत सराईतपणे आपली ओळख बदलून महिलांची दिशाभूल करत असे.
नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील धागेदोरे पुण्यातही आढळले आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून अधिक तपास सुरू केला आहे. त्याच्या संपर्कात आणखी किती महिला होत्या आणि त्याने आतापर्यंत एकूण किती लाखांची फसवणूक केली आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

