विकृत मनोवृत्तीतून निर्माण होणाऱ्या घटना चिंताजनक: ज्योत्स्ना मुंढे
गौरीशंकर फार्मसी लिंब येथे निर्भया जनजागृती अभियानाचे आयोजन.
सातारा
समाजातील काही विकृत व्यक्तींच्या मनोवृत्तीतून निर्माण होणाऱ्या घटना सामाजिकतेला बाधक ठरत असून अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी सातारा पोलीस प्रशासन सक्षम असल्याचे मत सातारा तालुका पोलीस दलाच्या ज्योत्स्ना मुंढे यांनी व्यक्त केले. त्या लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात महिला सुरक्षा व निर्भया जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. रोहन खुटाळे, प्रा. माधुरी मोहिते, सातारा तालुका पोलीस दलाचे प्रज्वल जाधव, प्रथमेश निकम, विक्रम गांधळे, कराटे प्रशिक्षक प्रीती गोंधळी आदी प्रमुख उपस्थित होते.
ज्योत्स्ना मुंढे पुढे म्हणाल्या की, महिलांवरील अन्याय व अत्याचार तसेच विद्यार्थिनींचे वाढते छेडाछेडीचे प्रमाण पाहता प्रभावी उपाययोजना सातारा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहेत. विद्यार्थिनींनी संकट काळात भयभीत न होता पोलीस दलाच्या 112 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधल्यास त्यांना तातडीने मदत मिळेल.
प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की, राज्याबरोबरच जिल्ह्यातही महिला व बालिकावरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिला विशेषतः विद्यार्थिनींची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असून यासाठी प्रत्येकाने जागृत राहावे.
संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की, महिला सशक्तिकरण व समानतेच्या कितीही वल्गना केल्या तरी 21व्या शतकात स्त्री आजही असुरक्षित असल्याचे पदोपदी घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शैलजा जाधव, संजय देशमाने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. गौरी इथापे यांनी केले.
