कोल्हापुरात बहीण-भावाची तलावात आत्महत्या
आईच्या निधनाचा विरह सहन नाही झाला
कोल्हापूर
आईचे निधन झाल्याने नैराश्यातून बहीण – भावाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला.भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१) आणि भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (वय ५७, दोघे रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम तलावात गुरुवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली असून, त्यामध्ये भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही अविवाहित असून, अडीच महिन्यांपूर्वी आईचे निधन झाल्याने नैराश्यातून आणि विरह सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवले.
