50 ग्रॅमची किंमत तब्बल 850 कोटी


बिहारमध्ये ‘कॅलिफोर्नियम’ धातू जप्त

Advertisement

पाटना
बिहारमधल्या गोपालगंज भागात पोलिसांकडून मोठी कारवाई केली असून 50 ग्रॅम कॅलिफोर्नियम या मौल्यवान किरणोत्सारी पदार्थासह 3 तस्करांना अटक केलीय. जप्त करण्यात आलेल्या कॅलिफोर्नियमच्या 50 ग्रॅमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत तब्बल 850 कोटी रुपये आहे.
कॅलिफोर्नियमचा उपयोग अणुभट्ट्यांपासून अणुऊर्जा निर्मितीसाठी, तसंच मेंदूच्या कॅन्सरसारख्या अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. प्रामुख्यानं याचा वापर अणुभट्ट्या सुरू करण्यासाठी, कोळसा ऊर्जा प्रकल्प ऑप्टिमाइझ करण्यासाठी, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आणि जमिनीतून तेल काढण्यासाठी केला जातो. कॅलिफोर्नियम प्रयोगशाळेत तयार केलं जातं व ते तयार करण्याचं प्रमाणही कमी आहे. यामुळेच त्याची किंमत खूप जास्त आहे.
कॅलिफोर्नियम हा सिंथेटिक किरणोत्सारी पदार्थ आहे. तो बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या एका टीमने 1950मध्ये प्रथम तयार केला होता. या पदार्थाचं नाव अमेरिकेतलं कॅलिफोर्निया राज्य आणि तो शोधणाऱ्या विद्यापीठाच्या नावावरून देण्यात आलंय. कॅलिफोर्नियम पदार्थ पीरिऑडिक टेबल अ‍ॅक्टिनाइड सीरिजमध्ये येतो. हा नैसर्गिक पदार्थ नाही. तो अणुविक्रियांद्वारे तयार होतो. तो चांदीसारखा चमकदार दिसतो. तो सुमारे 900 अंश सेल्सिअस तापमानात वितळतो. शुद्ध असणारा कॅलिफोर्नियम धातू इतका मऊ असतो, की तो अगदी सहजपणे कापला जातो. रूम टेम्परेचरला तो खूप कडक होतो.
कॅलिफोर्नियममधला घटक अत्यंत किरणोत्सर्गी असल्यानं तो आरोग्यासाठी खूप धोकादायक मानला जातो. त्यामुळे त्याचा कोणताही जैविक उपयोग अद्याप झालेला नाही. कॅलिफोर्नियम जेवढा चमकदार असतो, तेवढाच तो जास्त धोकादायक असतो. हा धातू प्रत्येक सजीवाच्या आनुवंशिकतेला नुकसानकारक ठरतो.
कॅलिफोर्नियम हा न्यूट्रॉनचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे तो अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये न्यूट्रॉन स्टार्टअप स्रोत म्हणून वापरला जातो. याशिवाय मेंदू आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरवर उपचार करताना याचा उपयोग होतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!