बंडूदादा साळुंखे ग्रंथालयाचे विचार विकासात मोलाचे योगदान


वर्धापनदिनी मान्यवरांकडून गौरव

Advertisement

सातारा
वाचनामुळे माणूस विचार सन्मुख होतो. त्याच्या विचार विकासासाठी बंडू दादा साळुंखे ग्रंथालय करीत असलेले प्रयत्न मोलाचे आहेत,अशा शब्दात अनेक मान्यवरांनी ग्रंथालयाच्या वाटचालीचे कौतुक केले.
वडगाव – हवेली येथील बंडू दादा साळुंखे वैचारिक विकास ग्रंथालयाच्या पंधराव्या वर्धापनदिनी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सरपंच – सेवानिवृत्त राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक राजेंद्र जगताप होते. जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यवाह नंदाताई जाधव म्हणाल्या ,की सध्याच्या काळात वाचनाकडे ओढ कमी झाली आहे. बालके आणि मुलांना पुन्हा वाचनाकडे वळवण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. यासाठी ग्रंथालय पुढाकार घेऊन विशेष पर्यावरण निर्माण करून पाहत आहे, ही समाधानाची बाब आहे. ग्रंथालय चळवळीकडे आणि या चळवळी समोरील आव्हानांकडे शासनाचे लक्ष नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत नलावडे म्हणाले, वडगाव हवेली सारख्या गावात डॉक्टर एस. बी .साळुंखे यांनी हे ग्रंथालय उभे करून ते यशस्वी चालवले आहे. या ग्रंथालयातील वाचक पुढील काळात गावच्या सामाजिक परिवर्तनात मोठी भूमिका बजावतील.
सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक वसंतराव गायकवाड म्हणाले, वाचनामुळे माणूस विवेकी बनण्यात मोठी मदत होते. विवेकाच्या वाटेवर आणून सोडणारे हे ग्रंथ आणि चळवळीचा गावोगावी प्रसार व्हायला हवा. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी ग्रंथालयात अधिक पुस्तकांची आणि वाचक सभासदांची संख्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
ग्रंथालयाचे संस्थापक डॉ.एस. बी. साळुंखे यांनी ग्रंथालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला . 1963 मधील सातव्या इयत्तेतील वर्ग मित्रांनी ग्रंथालयासाठी यावेळी कपाटे दिली .
हिंदुस्तान पेट्रोलियम चे अधिकारी खाडे यांनी याप्रसंगी ग्रंथालयाला पाच हजार रुपयांची देणगी दिली वसंतराव गायकवाड नंदाताई जाधव यांनी ग्रंथ भेट दिली.
सुरुवातीला ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत बंडू दादा साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांनी केले. याप्रसंगी
सत्यवान जगताप ,रणजीत जगताप, संपत जगताप, गणपत गोखले आदींनी मनोगत व्यक्त केले. जगन्नाथ उर्फ जे.जे . जगताप यांनी सूत्रसंचालन केले .
कार्यक्रमास राजाराम साळुंखे , राजेंद्र जगताप, मुख्याध्यापक खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!