‘अहल्या’ हे स्त्री वादावरचे भाष्य – अश्‍विनी धोंगडे


विश्‍वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे
‘अहल्या’ हे खंडकाव्य हिंदीचा अनुवाद नसून मराठीतच लिहिले आहे असे वाटावे इतके उत्तम आणि सूचक आहे. हे काव्य म्हणजे स्त्री वादावरचे भाष्य असल्याची भावना ज्येष्ठ समीक्षिका अश्‍विनी धोंगडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्‍यात आले.
धोंगडे यांनी ‘अहल्या’ या शब्दाचा नेमका अर्थ उलगडून तिचा जीवनप्रवास सांगितला. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातल्या अवस्था कशा आहेत आणि त्या काव्यात कशा उमटल्या आहेत ते स्पष्ट केले. पुरुषाने हे काव्य लिहूनही स्त्रीची वेदना आणि तिचे मन यातील ओळी-ओळींमधून व्यक्त झाले आहे. मूळ हिंदी कवी बलदेव वंशी आणि ज्यांनी मराठीत हे खंडकाव्य आणले ते विश्‍वास वसेकर यांनी ‘स्त्रीची वेदना मांडायला स्त्रीच हवी’ हे समीकरण खोटे पाडले आहे असे म्हणायला हरकत नाही,असे त्या म्हणाल्या
शीतल पवार म्हणाल्या,आपण कुटुंबात सहजपणे बोलताना, ‘मी बायकोला स्वातंत्र्य दिले आहे असे म्हणतो, खरेतर तिचा माणूस म्हणून विचार झाला पहिजे, स्वातंत्र्य देणारा पुरुष कोण? राज्यघटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य दिले आहे आजच्या तरुण पिढीने स्त्री स्वातंत्र्याचा विचार करताना संस्थात्मक पद्धतीने विचार केला पाहिजे. स्त्री सन्मान हा केवळ बोलण्यात न दाखवता तो कृतीत आणि समाजात वावरताना अंमलात आणला गेला पाहिजे. नवी पिढी आणि स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना यावर त्यांनी मार्मिक भाष्य केले.
या कार्यक्रमात राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, डॉ. वर्षा तोडमल यांची या काव्यसंग्रहाची सौदर्यस्थळे सांगणारी तसेच ही कविता कशी वाचावी याबद्दल मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आभार मानले.
लेखक – प्रकाशक प्रेक्षकांत
प्रकाशन कार्यक्रमात लेखक व प्रकाशक व्यासपीठावर असतात. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने कवी विश्‍वास वसेकर व प्रकाशक नितीन कोत्तापल्ले हे पूर्ण कार्यक्रमभर श्रोत्यांमध्ये बसून होते. व्यासपीठावर वक्ते आणि अध्यक्षाच उपस्थित होत्या. स्त्री वादावर भाष्य करणारे पुस्तक असल्याने सर्व महिलांना त्यांनी भाषणे करण्यास सांगितले. त्यांनी पूर्ण कार्यक्रमात भाषण न करता श्रोत्यांची भूमिका बजावली हे विशेष


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!