उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा फ्लॉप
काँग्रेस नेत्यांकडून कोणतेच ठोस आश्वासन नाही
मुंबई
विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीतील बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महासचिव के. सी. वेणुगोपाल अशा नेत्यांची भेट घेतली. विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अशा दोन महत्त्वाच्या मागण्या घेऊन ठाकरे दिल्लीला गेले होते. पण उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा फ्लॉप झाल्याचे स्पष्ट होत आहे.काँग्रेसचे दिल्ली आणि राज्यातील नेते आता ठाकरेंसमोर नमतं घेण्याच्या तयारीत नाहीत असे दिसते
लोकसभेला काँग्रेसनं ठाकरेंसमोर नमतं घेतलं.सांगलीसारखी पारंपारिक जागा सोडली. पण तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत सर्वात कमी स्ट्राईक रेट ठाकरेसेनेचा राहिला. अनेक महत्त्वाच्या जागा त्यांच्या पक्षानं गमावल्या. या सगळ्याची आठवण काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना दिल्ली दौऱ्यात करुन दिल्याचं कळतं.
उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी ठाकरेसेनेकडून केली जात आहे. हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मांडला. पण त्यांची मागणी मान्य झाली नाही. भाजपचे नेते ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप करत आहेत. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर केल्यास भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळेल. निवडणूक व्यक्तीकेंद्रीत होईल. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल, असं काँग्रेसकडून ठाकरेंना सांगण्यात आलं.
लोकसभेला आपण पंतप्रधानपदाचा चेहरा न देता लढलो. त्यावेळी आपल्याला चांगलं यश मिळालं, याची आठवण ठाकरेंना करुन देण्यात आली. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं सूत्र काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना सांगितलं.जागावाटपात अधिक जागांसाठी आग्रह धरणाऱ्या ठाकरेंना काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेतील चुकांची आठवण करुन दिली. ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसनं सांगलीची जागा सोडली. पण तिथे काँग्रेसचा बंडखोर निवडून आला. तर ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, संभाजीनगरसारख्या जागांवर शिवसेना कमी पडली. अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती, अशा चुकांचा पाढाच काँग्रेसच्या नेत्यांनी वाचल्याचं कळतं.
लोकसभेला काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. शरद पवारांनी केवळ दहाच जागा लढवल्या. पण त्यातल्या ८ जागा निवडून आणल्या. काँग्रेसनं थेट लढतीत भाजपच्या उमेदवारांना पाणी पाजलं. तर शरद पवारांनी अजित पवारांना शह दिला. पण ठाकरेंचा स्ट्राईक रेट मात्र शिंदेसेनेपेक्षा कमी राहिला. या सगळ्याची आठवण करुन देत विधानसभेला काँग्रेस बॅकफूटवर येणार नसल्याचं ठाकरेंना सांगण्यात आल्याचं समजतं.