क्रीडा भारतीच्या दोन क्रीडा केंद्रांचे उद्घाटन
पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
पुणे
क्रीडा भारतीच्या वतीने क्रीडा भारती व दिव्यांग कल्याण केंद्र, वानवडी,पुणे येथे शुटींग रेंज सुरु करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या क्रीडा मैदानावर क्रीडा केंद्र सुरु करणार आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ नोव्हेंबर रोजी म.ए.सो.मुलांचे (भावे) विद्यालय पुणे या ठिकाणी दुसरे क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले.या क्रीडा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य व क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे सदस्य व म ए सो मुलांचे विद्यालय या शाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिकेएसव्हीएम अकादमी (कृष्णा काळे सहकार नगर) यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.
क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष विजय पुरंदरे यांनी क्रीडा केंद्र सुरू करण्यामागची भूमिका विषद केली. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे विजय भालेराव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे शेवटी सहसचिव क्रीडा भारती पुणे महानगर भाऊसाहेब खुने यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजपूत यांनी केले.
तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूल तिसरे क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले.तसेच मुलांना व मुलींना बालपणापासूनच खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून बाल क्रीडांगणचे उद्घाटन करण्यात आले.या क्रीडा केंद्राचे उद्घाटन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवी देव व प्रदीप वाजे सहसचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदीप वाजे व क्रीडा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी यांनी उपस्थित सर्व विध्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजपूत यांनी केले तर कबड्डी खेळाडू ज्योती भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.
या क्रीडा केंद्रामध्ये मल्लखांब, क्रिकेट,कबड्डी आणि बाल क्रीडांगण अशा चार खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या सर्व उद्घाटन प्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि पुणे महानगराच्या व पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या उपाध्यक्ष श्रीमती शकुंतला खटावकर,क्रीडा भारतीचे अध्यक्ष शैलेश आपटे, क्रीडा भारतीचे पुणे महानगराचे मंत्री आणि अखिल भारतीय कार्यालयीन प्रमुख विजय रजपूत,हरिश अनगोळकर, अनुजा दाभाडे, मल्लखांब खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजित शिंदे,आशिष वैद्य,स्वाती बेने,दिपक मेहेंदळे,योगीराज टाकले, सुवर्णा मांढरे,कृष्णा काळे खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.