अमन सहरावतला ब्रॉन्झ पदक


पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात पराक्रम

पॅरिस

Advertisement

पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे.अमनच्या या पदकामुळे आता भारताची पदकसंख्या सहावर जाऊन पोहोचली आहे.अमन या ऑलिंपिकमध्ये खेळणारा भारताचा एकमेव पुरुष पैलवान आहे.
अमननं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण त्याचा पराभव झाला होता. त्यानंतर त्याला रिपेचाजमध्ये कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळाली.9 ॲागस्टला झालेल्या सामन्यात अमननं प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूझवर गुणांच्या आधारे 13-5 अशी मात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट लिहून अमन सहरावतचं अभिनंदन केलं आहे.यापूर्वी गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात अमन सहरावतला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात जपानच्या के रेई हिगुचीने अमनचा पराभव केला होता.सुवर्णपदक विजेत्या जपानच्या मल्लविरुद्ध अमनचा 10-0 असा पराभव झाला होता. त्याआधी झालेल्या उपउपांत्य फेरीत अमनने अल्बानियाच्या अबकरोव्हचा 12-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.अमनने त्याच्या पहिल्या फेरीत माजी युरोपियन चॅम्पियन असलेल्या व्लादिमिर एगोरोव्हचा 10-0 असा दणदणीत पराभव केला होता.या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना एकही पदक मिळालं नव्हतं. त्यामुळे यंदा भारतीय कुस्तीपटू रिकाम्या हाताने भारतात परत येण्याची भीती कुस्तीप्रेमींना सतावत होती पण अमनने तसं होऊ दिलं नाही.
महिलांच्या कुस्तीमध्ये भारताला विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती. विनेशने उपांत्य फेरीत सफाईदार विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेशही केला होता पण अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आणि संपूर्ण देशात निराशा पसरली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!