भारत श्रीलंका सामना टाय


14 चेंडूत 1 धाव हवी असतानाही सामना बरोबरीत

Advertisement

कोलंबो
श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खिशात घातल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही विजय घोडदौड सुरू ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 14 चेंडूत केवळ एक धाव विजयासाठी आवश्यक असतानाही टीम इंडियाला विजय मिळवत आला नाही आणि सामना टाय झाला
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 47.5 षटकांत 230 धावाच करू शकला.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 230 धावा केल्या होत्या. श्रीलंकेसाठी ड्युनिथ वेललागे आणि निसांका यांनी अर्धशतकी खेळी खेळली. भारतासाठी गिल वगळता सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. एकवेळ श्रीलंकेच्या संघाने 105 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. पण वेल्लालाघे आणि निसांका यांच्या जोरावर संघाने दमदार पुनरागमन करत 200 चा टप्पा पार केला.
230 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. रोहितने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर कुणाला नावाला साजेशी खेळी करता आली नाही. सलामीवीर शुभमन गिल 35 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्माने 47 चेंडूत 58 धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज वेल्लालाघेने बाद केले. वॉशिंग्टन सुंदरला केवळ पाच धावा करता आल्या. सेट झाल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही बाद झाले. कोहलीने 32 चेंडूत 24 आणि श्रेयसने 23 चेंडूत 23 धावा केल्या. केएल राहुल आणि अक्षर यांच्यात 57 धावांची भागीदारी झाली. पण, राहुल 31 धावा करून बाद झाला तर अक्षर 33 धावा करून माघारी परतला.
कुलदीप यादव दोन धावा करून बाद झाला. यानंतर शिवम दुबेने काही मोठे फटके खेळले पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. भारताला शेवटच्या 18 चेंडूत फक्त पाच धावा हव्या होत्या पण असलंकाने शिवम आणि अर्शदीपला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना बरोबरीत सोडवला. शिवम दुबे 24 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना बरोबरीत सुटण्याची ही दुसरी वेळ आहे. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा-चरित असलंका यांनी 3-3 तर डुनिथ वेललागेने 2 गडी बाद केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!