मनू भाकरचा डबल धमाका
एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय
पॅरिस
भारताच्या मनू भाकरनं नेमबाजीमध्ये एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची कमाल केली आहे.मनूनं सरबजोत सिंगच्या साथीनं 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मिश्र सांघिक नेमबाजीत कांस्य पदक मिळवलं. याआधी महिलांच्या वैयक्तिक 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धेतही मनूनं कांस्यपदक जिंकलं होतं.
मनू आणि सरबजोतनं काल झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं होतं. आज त्यांनी कांस्य पदकाच्या लढतीत दक्षिण कोरियावर 16-10 अशी मात केली. मिश्र नेमबाजीत भारताचं हे पहिलं ऑलिंपिक पदक आहे.
अवघ्या 22 वर्षांच्या वयात मनूनं हे ऐतिहासिक यश मिळवलं आहे.मनूला कांस्य पदकासाठीच्या फायनलमध्ये साथ देणारा सरबजोत सिंगही अवघ्या 22 वर्षांचा आहे.सरबजोतनं याआधी 2022 मध्ये हांगझूमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारांत सुवर्णपदकं मिळवली होती.तर 2023 साली भोपाळ आणि बाकूमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्येही त्यानं सुवर्णपदकांची कमाई केली.
