केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन
19 जणांचा मृत्यू, ,400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली
वायनाड
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असून, 19 जणांचा मृत्यू झाला आहे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ ही घटना घडली.पहाटे 2 वाजता या भागात पहिला भूस्खलन झालं. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन झाला. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामला आणि नूलपुझा गावांना भूस्खलनाचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एक एएलएच, बचाव कार्यासाठी सुलूरमधून रवाना झाले आहेत. किमान 50 लोक मेपाडीमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले आहे की, ‘वायनाडमधील भूस्खलनावर सर्व संभाव्य बचाव कार्यात समन्वय साधला जाईल. आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यापासून सरकारी यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. मंत्री वायनाडला भेट देतील आणि उपक्रमांचे नेतृत्व करतील.
राहुल गांधी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला
वायनाडचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनाने मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे अजूनही अडकले आहेत त्यांची लवकरच सुखरूप सुटका होईल.’
