साताऱ्यात मंगळवारी ‘दिल जो ना कह सका’ मैफिलीचे आयोजन
मिळून साऱ्याजणी’च्या वतीने आयोजन
सातारा: दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’ या उपक्रमांतर्गत ‘भाग दुसरा – लेडीज स्पेशल एपिसोड’ चे आयोजन करण्यात आले आहे. या भागात ‘दिल जो ना कह सका’ या संकल्पनेवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा एक सुंदर आणि सुरेल नजराणा रसिकांसाठी सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता ‘दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल’ येथे संपन्न होणार आहे. या सांगीतिक मैफिलीमध्ये मंजुश्री जावळे, स्नेहल चिंचणे, रमिजा सय्यद, धनश्री बागडे, गीता उधानी, रागिणी शिकलगार आणि ज्योत्स्ना या गुणी गायिका आपल्या मधुर आवाजात एकापेक्षा एक सरस गाणी सादर करणार आहेत. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार निवेदन सौ. सारिका घोरपडे करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, विजय साबळे, शहाबुद्दीन शेख, विनय कुलकर्णी, हृदयनाथ गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या स्वरमयी आणि आनंददायी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व रसिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

