कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग
पाटण
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर वाढला असून धरणात प्रति सेकंद तब्बल 49 हजार 452 क्युसेक पाण्याची आवक होत आहे परिणामी कोयना जलाशयाच्या पातळीत वाढ झाली असून कोयना धरणातील पाणीसाठा ६६.१७ टीएमसी वर पोहोचला आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी धरणाच्या एका विद्युतगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात आला.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून आज दिवसभर पावसाची संततधारा चालू होती.परिणामी कोयना जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जलसाठा नियंत्रित करण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने कोयना नदीपात्रात विद्युतगृहातून विसर्ग केला यामुळे कोयना नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
पावसाचा जोर वाढल्यास पायथा विद्युत गृहाचे दुसरे युनिट की चालू करून त्याद्वारे जलसाठा नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे यामुळे कोयना नदीकाठातील गावांना कोयना नदीची पाणी पातळी वाढल्याने धोका निर्माण होणार आहे यासाठी प्रशासनाने संबंधित गावांना धोक्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती तर कोयना केरा वांग काफना मोरणा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. तर चाफळ विभागातील उत्तर मांड तसेच मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी या मध्यम प्रकल्पातून पाण्याचा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे रस्ते छोटे पूल पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्याव्या अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
कोयना पणलोट क्षेत्रातील नवजा या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक 3265 मिलिमीटर पाऊस पडला आहे तर गेल्या 24 तासात कोयना पानलोट क्षेत्रातील कोयना 224 नवजा 182 तर महाबळेश्वर येथे 198 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
