आधी माणसे वाचली, मग लेखन केले
लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात डॉक्टर राजेंद्र माने यांचे प्रतिपादन
सातारा
चांगला लेखक होण्यासाठी आधी चांगले वाचन करणे आवश्यक असते. त्याच प्रकारे मी आयुष्यात आधी माणसांचे वाचन केले आणि नंतर त्या अनुभवाच्या जोरावर लेखन केले असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक तुमच्या भेटीला या मालिके अंतर्गत डॉक्टर राजेंद्र माने यांच्याशी संवाद साधण्यात आला त्यावेळी ते बोलत होते डॉक्टर संदीप श्रोत्री आणि सौ शिल्पा चिटणीस यांनी डॉक्टर राजेंद्र माने यांना बोलते केले
वहिनीसाहेब,धाकटा वाडा, प्रिय,वळणावरची माणसं अशा अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखक असलेल्या डॉक्टर राजेंद्र माने यांनी या संवादामध्ये आपला लेखन प्रवास उलगडून दाखवला. आष्टा येथील वास्तव्यामध्ये संपर्कात आलेली काही माणसे असोत किंवा नंतर काळाच्या ओघात भेटलेली माणसे असोत किंवा वैद्यकीय व्यवसाय करताना भेटलेले रुग्ण असोत त्यांनी विविध प्रकारचा अनुभव दिल्यामुळे लेखनामध्ये तो उतरला असे त्यांनी स्पष्ट केले
वसंत सबनीस यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाने पहिल्या पुस्तकासाठी निरपेक्षपणे सहकार्य केल्यामुळेच मी लेखक होऊ शकलो अशी प्रांजल कबुलीही त्यांनी दिली महाराष्ट्रात किंवा देशात कोठेही भरवण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणीवपूर्वक उपस्थित राहत असल्याने त्याचाही लेखनाला लाभ झाला असे त्यांनी नमूद केले
सातारच्या मातीमध्ये वेगळे गुण असल्याने येथे सहकार्याची भावनाही आहे. विविध संस्थांशी संबंध आहे.लेखन कलेला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे पुणे किंवा इतर मोठ्या शहरांचे मला आकर्षण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन मुकुंद फडके यांनी केले कार्यक्रमाला आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे सदस्य आणि साहित्य रसिक उपस्थित होते

