भररस्त्यात प्रेयसीचा खून
तरुणीवर हल्ला होत असताना कुणीही पुढे आले नाही.
मुंबई
वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर तरुणाकडून तरुणीवर हल्ला केला जात असताना कुणीही पुढे गेलं नाही.या तरुणाच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तरुणीच्या डोक्यात वार केले. घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या तरुणीशी तो बोलत होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने लोखंडी पाना तिच्या डोक्यात मारला. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वसई पूर्व चिंचपाडा परिसरात रोहित यादव नावाच्या तरुणाने आरती यादव हिची हत्या केली. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी रस्त्याने जात असताना मागून येत तरुणाने तिच्या डोक्यात वार केले. यानंतर खाली पडलेल्या तरुणीच्या डोक्यावर जोरजोरात वार केले. तरुणाला काहींनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.तरुणीच्या डोक्यात लोखंडी पान्याने वार करताच तरुणी खाली पडली. यावेळी तिने स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड केली. मात्र तरुणाने लागोपाठ तिच्या डोक्यात वार केले. शेवटी रक्ताच्या थारोळ्यातच ती गतप्राण झाली. यानंतर तरुण तिच्या शेजारी बसून तिला तू असं का केलंस? असं विचारत होता. सतत हा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा एकदा त्याने तिच्या डोक्यात वार केला.तरुणीच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आरोपीने कोणत्या कारणाने तिची हत्या केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे.
