उदयनराजेनी मानले शिवेंद्रराजेंचे आभार
शिवेंद्रराजेंसारखा मांजा असताना माझा पतंग कसा कटेल
सातारा
लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पतंग कटणार असे अनेक जण सांगत होते. मात्र शिवेंद्रसिंहराजेंसारखा मांजा हातात होता. त्यामुळे माझा पतंग कटला नाही तर अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले
खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या विजयानंतर सुरुची येथे जाऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत केलेल्या सहकार्याबद्दल मनोमन आभार मानले. त्यांच्या पोटात हलकी बुक्की मारून त्यांना त्यांचे आवडते कॅडबरी चॉकलेट गिफ्ट दिले.खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन पूर्वीच लोकसभेच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली ताकद पणाला लावून खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात मनापासून काम केले. सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना ३६ हजाराचे लीड मिळाले. त्यामुळेच उदयनराजे यांना शेवटच्या टप्प्यात निर्णायक विजय मिळाला. हे सहकार्य लक्षात घेऊन खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची सुरुचीवर रात्री उशिरा आवर्जून भेट घेतली. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना जादू की झप्पी देत त्यांना त्यांची आवडती कॅडबरी गिफ्ट दिली
खासदार उदयनराजे म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातारा शहर आणि तालुका, जावलीत मला मोठे लीड मिळवून, याची मला जाणीव राहील. यापुढे सर्वांना विचारूनच माझा निर्णय होईल.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पार पाडू शकलो, याचे समाधान आहे. कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले उदयनराजे भाजपचे साताऱ्याचे पहिले खासदार आहेत, याची कायम नोंद राहील. यात मी योगदान देऊ शकलो याचा अभिमान आहे. उदयनराजेंनी आता सातारा जिल्ह्याचा विकास करावा, जे शब्द दिले, त्याची त्यांनी पूर्तता करावी. त्यासाठी आमचे सहकार्य राहील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
