मॉन्सूनची गुड न्यूज


सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता

Advertisement

पुणे :
जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. या आधी एप्रिलमधील अंदाजातही आयएमडीने सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्रातही मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
हंगामाच्या विभागनिहाय अंदाजानुसार, यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. मेपर्यंतच्या हवामानाच्या नोंदी गृहीत धरून देण्यात येणारा मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील हंगामी अंदाज ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला.
डॉ. महापात्रा म्हणाले, ‘यंदा मान्सून हंगामातील पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के (त्रुटी कमी- अधिक चार टक्के) राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पावसाची १९७१ ते २०२० या काळातील राष्ट्रीय सरासरी ८७० मिलिमीटर आहे. जम्मू- काश्मीर, लडाख, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग वगळता देशात इतरत्र पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असेल.जून महिन्यात देशभरात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण (महिन्याच्या सरासरीच्या ९२ ते १०८ टक्के) राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त, तर उत्तर भारत आणि मैदानी क्षेत्रामध्ये जूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जूनच्या पावसाची राष्ट्रीय सरासरी १६५.४ मिलिमीटर आहे.
रेमल चक्रीवादळाची तीव्रता सोमवारी कमी झाली असून, पुढील दोन दिवसांत वादळाचा प्रभाव ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत होऊन येत्या पाच दिवसांत मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या विस्तारित अंदाजानुसार, मान्सूनच्या केरळमधील आगमनानंतर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सक्रिय राहणार असून, सहा ते १३ जून या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रापर्यंत दाखल होऊ शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!