कन्या शाळा येथे निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा
सातारा :
९९ वे साहित्य संमेलन साताऱ्यात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सातारा येथील कन्या शाळेत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आठवी ते दहावी आणि पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कन्या शाळेची इयत्ता दहावीतील सेजल वाघमोडे हिने प्रथम पुरस्कार पटकावला, तर वृषाली रोमन हिला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. इतर सर्व सहभागी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास ‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूहाचे प्रमुख डॉ. संदीप श्रोत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व विशद करत वाचनामुळे विचारशक्ती, भाषासामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढतो, असे मार्गदर्शन केले. भविष्यात निवडक निबंधांचे पुस्तक प्रकाशित करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
शाळेच्या प्राचार्या वर्षा काळे , गौरी कुलकर्णी आणि सुजाता गेंगजे यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अतिशय सुयोग्यरीत्या पार पडला. प्रमाणपत्र व बक्षीस वितरण डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल आणि काळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. श्रोत्री यांनी निबंध स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला आणि वाचनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गौरी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी शाळेच्या ग्रंथालयालाही भेट दिली.
वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्त्व घडविणारी शक्ती आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन उज्ज्वल पिढी घडण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
फोटो
सेजल वाघमळे यांना पुरस्कार देताना डॉक्टर संदीप श्रोत्री,समवेत श्रीराम नानल व वर्षा काळे

